Tuesday, 13 December 2016

श्री क्षेत्र नृसिंहवाडी, कोल्हापूर

।।दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।।
              श्री क्षेत्र नृसिंहवाडी अर्थातच दत्तसंप्रदायाची राजधानी. नृसिंहवाडी हे कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पावन संगमावर वसलेले हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. श्री दत्तगुरूंच्या अवतारामुळे नृसिंहवाडीचा परिसर पावन झाला असून स्वयंभू पादुकांची येथे अखंड पूजा अर्चा चालू असते. श्री दत्त गुरूंचे साक्षात तिसरे अवतार मानले गेलेले श्री नृसिंह सरस्वती यांनी औदुंबर वृक्षांनी बहरलेल्या या अरण्य भूमीत १२ वर्षे वास्तव्य केले व परिसर सुफल केला.
              अमरापुर या नावाने या क्षेत्राचा महिमा गुरुचरित्रात वर्णिलेला आढळतो. श्री नृसिंह सरस्वती औदुंबरचा चातुर्मास संपवून भ्रमंतीस निघाले असता संचार करता करता ते या ठिकाणी येऊन पोहचले त्यावेळी येथे औदुंबर वृक्षाची वनेच वने होती. दत्त भक्तांच्या आग्रहानुसार श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी येथे १२ वर्षे वास्तव्य केले त्यामुळे या क्षेत्राला नृसिंहवाडी अर्थात नरसोबावाडी असे नामाभिधान प्राप्त झाले. स्वामींनीच येथे दत्त पादुकांची स्थापना केली. या क्षेत्राला कृष्णा पंचगंगेच्या संगमामुळे व औदुंबर वृक्षांच्या घनदाट छायेमुळे प्रसन्नता आली आहे व स्वामींच्या वास्तव्याने पावित्र्यात आणखीनच भर पडली आहे.
               कृष्णेच्या प्रशस्त अश्या घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली सुंदर मनमोहक असे मंदिर आहे. वाडीहुन गाणगापूरला जाताना योगिनींच्या आग्रहावरून स्वामींनी वालुकामय पादुकांची स्थापना केली. त्यावरील सततच्या अभिषेकाने त्या झिजत नाहीत म्हणून त्यांची घडण चंद्रकांत पाषाणाची असावी असे म्हणतात. श्री गुरू ज्या औदुंबर वृक्षाखाली बसत असत तो वृक्ष आणि त्याखाली नदीसन्मुख मनोहर पादुका आहेत तसेच जय,विजय व नृसिंह सरस्वती महाराजांची प्रतिमा आहे. मंदिराभोवती मोठा गोलाकार मंडप असून त्याला चार ही बाजूनी उंच विस्तृत खांब आहेत.
              मार्गशीर्ष पौर्णिमेला अर्थात दत्त जयंतीला मोठा सोहळा साजरा केला जातो. याशिवाय नृसिंहजयंती गोपाळकाला उत्सव, श्रीपाद श्री वल्लभ जयंती साजरे केले जातात. दक्षिणद्वार सोहळा अर्थातच साधारणतः जुलै महिन्यात  कृष्णा नदीचे पाणी दत्त पादुकांपर्यंत पोहचते. थोडक्यात कृष्णामाईचं मनोहर दत्त पादुकांच्या अभिषेकासाठी अवतरते. यावर्षी कन्यागत महापर्वकाल हि साजरा होत आहे अर्थात साक्षात गंगा नदी अवतरली ती कृष्णा भेटीसाठी. मनोहर पादुकांचे दर्शन घेऊन या प्रसन्न वातावरणात मन अगदी भक्तीरसात चिंब होते व मंदिर परिसर हा ब्रह्मवृंदांच्या स्तोत्रपठणामुळे भक्तिमय होतो.
               नृसिंहवाडी हे कोल्हापूरपासून ४५ किमी आणि मिरज पासून अवघ्या १९ किमी अंतरावर वसलेले आहे. कोल्हापूरहुन जयसिंगपूर मार्गे तसेच इचलकरंजी, कुरुंदवाड मार्गे नृसिंहवाडीस जाता येते. मिरज व कोल्हापूरहून महाराष्ट्र राज्य परिवहन (MSRTC) मंडळाच्या बसेस सहज उपलब्ध होतात. तसेच निपाणी व चिक्कोडी पासून कर्नाटक राज्य परिवहन (KSRTC) मंडळाच्या बसेस देखील थेट नृसिंहवाडी साठी उपलब्ध आहेत आणि जयसिंगपूर रेल्वे स्थानकापासून अवघ्या १२ किमी अंतरावर नृसिंहवाडी आहे.
                  श्री नृसिंह सरस्वतींच्या पदस्पर्शाने पावन
झालेले असे हे दत्तक्षेत्र नृसिंहवाडी.
                      ।।श्री गुरुदेव दत्त।।

No comments:

Post a Comment

आठवणी शाळेच्या..!!!

               लिंबाचे लोणचे मुरले म्हणजे त्याला आंबट गोड रुचि येते! आयुष्यातल्या जुन्या आठवणीही अश्याच.... !!!               शाळेत रोज सक्...