Tuesday, 13 December 2016

श्री क्षेत्र नृसिंहवाडी, कोल्हापूर

।।दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।।
              श्री क्षेत्र नृसिंहवाडी अर्थातच दत्तसंप्रदायाची राजधानी. नृसिंहवाडी हे कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पावन संगमावर वसलेले हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. श्री दत्तगुरूंच्या अवतारामुळे नृसिंहवाडीचा परिसर पावन झाला असून स्वयंभू पादुकांची येथे अखंड पूजा अर्चा चालू असते. श्री दत्त गुरूंचे साक्षात तिसरे अवतार मानले गेलेले श्री नृसिंह सरस्वती यांनी औदुंबर वृक्षांनी बहरलेल्या या अरण्य भूमीत १२ वर्षे वास्तव्य केले व परिसर सुफल केला.
              अमरापुर या नावाने या क्षेत्राचा महिमा गुरुचरित्रात वर्णिलेला आढळतो. श्री नृसिंह सरस्वती औदुंबरचा चातुर्मास संपवून भ्रमंतीस निघाले असता संचार करता करता ते या ठिकाणी येऊन पोहचले त्यावेळी येथे औदुंबर वृक्षाची वनेच वने होती. दत्त भक्तांच्या आग्रहानुसार श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी येथे १२ वर्षे वास्तव्य केले त्यामुळे या क्षेत्राला नृसिंहवाडी अर्थात नरसोबावाडी असे नामाभिधान प्राप्त झाले. स्वामींनीच येथे दत्त पादुकांची स्थापना केली. या क्षेत्राला कृष्णा पंचगंगेच्या संगमामुळे व औदुंबर वृक्षांच्या घनदाट छायेमुळे प्रसन्नता आली आहे व स्वामींच्या वास्तव्याने पावित्र्यात आणखीनच भर पडली आहे.
               कृष्णेच्या प्रशस्त अश्या घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली सुंदर मनमोहक असे मंदिर आहे. वाडीहुन गाणगापूरला जाताना योगिनींच्या आग्रहावरून स्वामींनी वालुकामय पादुकांची स्थापना केली. त्यावरील सततच्या अभिषेकाने त्या झिजत नाहीत म्हणून त्यांची घडण चंद्रकांत पाषाणाची असावी असे म्हणतात. श्री गुरू ज्या औदुंबर वृक्षाखाली बसत असत तो वृक्ष आणि त्याखाली नदीसन्मुख मनोहर पादुका आहेत तसेच जय,विजय व नृसिंह सरस्वती महाराजांची प्रतिमा आहे. मंदिराभोवती मोठा गोलाकार मंडप असून त्याला चार ही बाजूनी उंच विस्तृत खांब आहेत.
              मार्गशीर्ष पौर्णिमेला अर्थात दत्त जयंतीला मोठा सोहळा साजरा केला जातो. याशिवाय नृसिंहजयंती गोपाळकाला उत्सव, श्रीपाद श्री वल्लभ जयंती साजरे केले जातात. दक्षिणद्वार सोहळा अर्थातच साधारणतः जुलै महिन्यात  कृष्णा नदीचे पाणी दत्त पादुकांपर्यंत पोहचते. थोडक्यात कृष्णामाईचं मनोहर दत्त पादुकांच्या अभिषेकासाठी अवतरते. यावर्षी कन्यागत महापर्वकाल हि साजरा होत आहे अर्थात साक्षात गंगा नदी अवतरली ती कृष्णा भेटीसाठी. मनोहर पादुकांचे दर्शन घेऊन या प्रसन्न वातावरणात मन अगदी भक्तीरसात चिंब होते व मंदिर परिसर हा ब्रह्मवृंदांच्या स्तोत्रपठणामुळे भक्तिमय होतो.
               नृसिंहवाडी हे कोल्हापूरपासून ४५ किमी आणि मिरज पासून अवघ्या १९ किमी अंतरावर वसलेले आहे. कोल्हापूरहुन जयसिंगपूर मार्गे तसेच इचलकरंजी, कुरुंदवाड मार्गे नृसिंहवाडीस जाता येते. मिरज व कोल्हापूरहून महाराष्ट्र राज्य परिवहन (MSRTC) मंडळाच्या बसेस सहज उपलब्ध होतात. तसेच निपाणी व चिक्कोडी पासून कर्नाटक राज्य परिवहन (KSRTC) मंडळाच्या बसेस देखील थेट नृसिंहवाडी साठी उपलब्ध आहेत आणि जयसिंगपूर रेल्वे स्थानकापासून अवघ्या १२ किमी अंतरावर नृसिंहवाडी आहे.
                  श्री नृसिंह सरस्वतींच्या पदस्पर्शाने पावन
झालेले असे हे दत्तक्षेत्र नृसिंहवाडी.
                      ।।श्री गुरुदेव दत्त।।

Saturday, 3 December 2016

Travel Diaries-4 स्वारी उत्तरेची, उत्तरप्रदेश

                  'उत्तरप्रदेश'- हे नाव ऐकलं कि सर्वप्रथम आपल्या नजरेसमोर येतो तो जगातील ७ आश्चर्यापैंकी एक जगप्रसिद्ध असलेला आग्र्याच्या ताजमहाल आणि पेठा. तसे पाहता लहानपणी भूगोलात या राज्याची तोंडओळख ही झालीच होती.लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य म्हणून हे सारे पुस्तकातून अनुभवले होते.परंतु उत्तरेच्या स्वारीचा अनुभव अजून एकदाही आला नव्हता आणि तो योग आला गेल्यावर्षी गणेश उत्सवाच्या कालावधीतच दिनांक १९ सप्टेंबर २०१५ रोजी. उत्तरेकडे झेप घेण्याचा माझा पहिलाच अनुभव होता. उत्तरेचे सांस्कृतिक वैभव प्रथमच अनुभवणार होतो. उत्तर भारतातील कला, संस्कृती, ऐतिहासिक वारसा, लोकांचे राहणीमान हे सारे अनुभवण्याची संधी होती. गणेशचतुर्थी नंतर अगदी दोनचं दिवसात Pune- Patna एक्सप्रेसने पुण्याहून प्रयाण झाले.
                मुक्काम ३ महिन्यासाठी असल्याने सर्व तयारीनिशी निघालो होतो(अर्थात उत्तरेत फार थंडी असते). साधारणतः २४ तासाच्या प्रवासानंतर अलाहाबादला पोहचलो आणि गणेश उत्सवाचा कालावधी असल्याने वातावरण अगदी प्रसन्न होते. आणि तसेच ऑफिसमधे गणपतीची आरती माझ्या हस्ते संपन्न व्हायची तो अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय होता.सप्टेंबर महिन्यात नुकतीच थंडीची चाहूल लागली होती आणि अश्या थंडीत आठवण येते ती म्हणजे वाफाळलेल्या चहाची. चहा सर्व्ह करण्याची नवी पद्धत येथे अनुभवास मिळाली ती म्हणजे मातीच्या कपमध्ये 'चहा serving'. वाफाळलेला चहा आणि गुलाबी थंडी अश्या विविध छबी टिपण्याचा मोह मला आवरता आला नाही. दसरा आणि दिवाळी हे दोन्ही सण माझे इथेच साजरे झाले. दसऱ्याला येथे मोठ्या प्रमाणात रावणदहन व शोभेचे दारुकाम केले जाते. या शोभेच्या दारूकामाने सांगोल्याच्या अंबिकादेवी मंदिराच्या यात्रेतील शोभेच्या दारूकामाची आठवण करून दिली.
                 दसऱ्यानंतर थंडी अगदी जोर पकडू लागली होती. त्यामुळे वाराणसी काशी अगदी ४ तासांच्या अंतरावर असून देखील आम्हाला तेथे जाता आले नाही. परंतु अलाहाबाद येथील गंगा यमुना त्रिवेणी संगम पाहता आला. तसेच उत्तरप्रदेशातील भौगोलिक सांस्कृतिक दृष्टीकोनासोबत खाद्यसंस्कृतीचा पुरेपूर आस्वाद घेतला. साधारणतः डिसेंबर महिन्यात थंडीचा जोर खुप वाढला होता तापमान अगदी ९℃ पर्यंत पोहचले होते. आणि याचवेळी एके दिवशी सकाळी भारताचा राष्ट्रीय पक्षी 'मोर' याचे ही दर्शन झाले. गुलाबी थंडी व धुके यामध्ये हरवलेला निसर्गाच्या विविध छटा टिपण्याचा अनुभव विलक्षण होता.
              अश्या तऱ्हेने साऱ्या आठवणी मनात साठवुन व पुढील यात्रेच्यावेळी वाराणसी काशीला भेट देण्याच्या निश्चयाने दिनांक २२ डिसेंबर २०१५ रोजी अलाहाबादहुन मुंबईसाठी प्रस्थान केले. अश्या तऱ्हेने उत्तरेच्या स्वारीचा पहिलाच अनुभव यशस्वी झाला होता.

Friday, 2 December 2016

Travel Diaries-3 Basar, Telangana

               पूर्वीच्या काळी लहान मुलांच्या शिक्षणाचा शुभारंभ हा 'अक्षरअभ्यासमं किंवा विद्यारंभम' द्वारे (Akashara Abhyasam/ Vidyarambham) केला जात असे. सध्या हि परंपरा भारतात कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या भागात प्रचलित आहे. तर 'अक्षरअभ्यासमं' म्हणजे नेमके काय असा तुम्हाला प्रश्न पडला असेल?
               तर 'अक्षरअभ्यासमं' हा एक धार्मिक पारंपारिक कार्यक्रम आहे ज्यात विद्येची देवता सरस्वती देवी यांची पूजा केली जाते व बालकाच्या शिक्षणाचा शुभारंभ केला जातो ज्यायोगे ते मुल पुढील शिक्षण घेण्यास तयार होते. अक्षरं म्हणजे मुळाक्षरे आणि अभ्यासमं म्हणजे अभ्यास थोडक्यात 'मुळाक्षरांचा अभ्यास'. 'ओम' हे साधारणपणे बीजाक्षर मानले जाते बीज (हा संस्कृत शब्द) म्हणजे मुळ. अर्थात अक्षरअभ्यासमंसाठी बासर मधील गोदावरी व मांजरा नदीच्या संगम तीरावर वसलेले सरस्वती मंदिर हे संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. येथे हा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा  केला जातो. सरस्वती देवी हि बुद्धी व ज्ञान यांची देवता आहे. हे भारतातील सर्वात प्राचीन असे मंदिर आहे.

बासर:
          बासर हे पूर्वीच्या आंध्रप्रदेश व सध्या तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्ह्यातील एक छोटेसे गाव आहे. बासर हे विद्येची देवता सरस्वती मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. भारतात फक्त दोनचं सरस्वती मंदिरे आढळतात एक तेलंगणा आणि दुसरे जम्मु काश्मीर. बासर हे साधारणपणे निझामाबाद पासून ३४.८ किमी, निर्मल पासून ७० किमी आणि हैदराबाद पासून सुमारे २०५ किमी अंतरावर वसले आहे.

● मंदिराचा इतिहास :
              हिंदू पुराणानुसार असे सांगितले जाते कि ज्या ठिकाणी महर्षी वेदव्यास यांनी तपस्या केली होती तेथे सरस्वती मंदिर बनले आहे या मंदिराचे निर्माण कार्य चालुक्य राजाच्या काळात झाले. हे मंदिर 'अक्षर अभ्यासमं' साठी प्रसिद्ध आहे. हि एक प्राचीन परंपरा बालकांच्या जीवनातील शैक्षणिक शुभारंभाची औपचारिकता सूचित करतो.

● सध्याचे मंदिर :
            संपुर्ण मंदिर परिसरातील वातावरण हे धार्मिक व शांतताप्रिय आहे. दसरा व महाशिवरात्री हे मुख्य उत्सव आहेत. सरस्वती, महालक्ष्मी आणि कालीमाता यामुळे बासर येथे नदीच्या संगमाबरोबरच भक्तीचा संगम देखील झाला आहे.

वाहतुक दळणवळण :
             'ज्ञान सरस्वती मंदिर', बासर हे तेलंगणाची राजधानी हैदराबाद पासून २०५ किमी अंतरावर असून TSRTC परिवहनच्या बसेस तसेच रेल्वे हैदराबाद पासून सहज उपलब्ध होतात. महाराष्ट्रवासीयांसाठी तर पंढरपूर-निझामाबाद (वाया बासर) हि थेट ट्रेन उपलब्ध आहे.
            
तर बासरमधील सरस्वती मंदिरास नक्की भेट द्या.

साभार : www.basartemple.org

आठवणी शाळेच्या..!!!

               लिंबाचे लोणचे मुरले म्हणजे त्याला आंबट गोड रुचि येते! आयुष्यातल्या जुन्या आठवणीही अश्याच.... !!!               शाळेत रोज सक्...