Tuesday, 13 December 2016

श्री क्षेत्र नृसिंहवाडी, कोल्हापूर

।।दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।।
              श्री क्षेत्र नृसिंहवाडी अर्थातच दत्तसंप्रदायाची राजधानी. नृसिंहवाडी हे कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पावन संगमावर वसलेले हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. श्री दत्तगुरूंच्या अवतारामुळे नृसिंहवाडीचा परिसर पावन झाला असून स्वयंभू पादुकांची येथे अखंड पूजा अर्चा चालू असते. श्री दत्त गुरूंचे साक्षात तिसरे अवतार मानले गेलेले श्री नृसिंह सरस्वती यांनी औदुंबर वृक्षांनी बहरलेल्या या अरण्य भूमीत १२ वर्षे वास्तव्य केले व परिसर सुफल केला.
              अमरापुर या नावाने या क्षेत्राचा महिमा गुरुचरित्रात वर्णिलेला आढळतो. श्री नृसिंह सरस्वती औदुंबरचा चातुर्मास संपवून भ्रमंतीस निघाले असता संचार करता करता ते या ठिकाणी येऊन पोहचले त्यावेळी येथे औदुंबर वृक्षाची वनेच वने होती. दत्त भक्तांच्या आग्रहानुसार श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी येथे १२ वर्षे वास्तव्य केले त्यामुळे या क्षेत्राला नृसिंहवाडी अर्थात नरसोबावाडी असे नामाभिधान प्राप्त झाले. स्वामींनीच येथे दत्त पादुकांची स्थापना केली. या क्षेत्राला कृष्णा पंचगंगेच्या संगमामुळे व औदुंबर वृक्षांच्या घनदाट छायेमुळे प्रसन्नता आली आहे व स्वामींच्या वास्तव्याने पावित्र्यात आणखीनच भर पडली आहे.
               कृष्णेच्या प्रशस्त अश्या घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली सुंदर मनमोहक असे मंदिर आहे. वाडीहुन गाणगापूरला जाताना योगिनींच्या आग्रहावरून स्वामींनी वालुकामय पादुकांची स्थापना केली. त्यावरील सततच्या अभिषेकाने त्या झिजत नाहीत म्हणून त्यांची घडण चंद्रकांत पाषाणाची असावी असे म्हणतात. श्री गुरू ज्या औदुंबर वृक्षाखाली बसत असत तो वृक्ष आणि त्याखाली नदीसन्मुख मनोहर पादुका आहेत तसेच जय,विजय व नृसिंह सरस्वती महाराजांची प्रतिमा आहे. मंदिराभोवती मोठा गोलाकार मंडप असून त्याला चार ही बाजूनी उंच विस्तृत खांब आहेत.
              मार्गशीर्ष पौर्णिमेला अर्थात दत्त जयंतीला मोठा सोहळा साजरा केला जातो. याशिवाय नृसिंहजयंती गोपाळकाला उत्सव, श्रीपाद श्री वल्लभ जयंती साजरे केले जातात. दक्षिणद्वार सोहळा अर्थातच साधारणतः जुलै महिन्यात  कृष्णा नदीचे पाणी दत्त पादुकांपर्यंत पोहचते. थोडक्यात कृष्णामाईचं मनोहर दत्त पादुकांच्या अभिषेकासाठी अवतरते. यावर्षी कन्यागत महापर्वकाल हि साजरा होत आहे अर्थात साक्षात गंगा नदी अवतरली ती कृष्णा भेटीसाठी. मनोहर पादुकांचे दर्शन घेऊन या प्रसन्न वातावरणात मन अगदी भक्तीरसात चिंब होते व मंदिर परिसर हा ब्रह्मवृंदांच्या स्तोत्रपठणामुळे भक्तिमय होतो.
               नृसिंहवाडी हे कोल्हापूरपासून ४५ किमी आणि मिरज पासून अवघ्या १९ किमी अंतरावर वसलेले आहे. कोल्हापूरहुन जयसिंगपूर मार्गे तसेच इचलकरंजी, कुरुंदवाड मार्गे नृसिंहवाडीस जाता येते. मिरज व कोल्हापूरहून महाराष्ट्र राज्य परिवहन (MSRTC) मंडळाच्या बसेस सहज उपलब्ध होतात. तसेच निपाणी व चिक्कोडी पासून कर्नाटक राज्य परिवहन (KSRTC) मंडळाच्या बसेस देखील थेट नृसिंहवाडी साठी उपलब्ध आहेत आणि जयसिंगपूर रेल्वे स्थानकापासून अवघ्या १२ किमी अंतरावर नृसिंहवाडी आहे.
                  श्री नृसिंह सरस्वतींच्या पदस्पर्शाने पावन
झालेले असे हे दत्तक्षेत्र नृसिंहवाडी.
                      ।।श्री गुरुदेव दत्त।।

Saturday, 3 December 2016

Travel Diaries-4 स्वारी उत्तरेची, उत्तरप्रदेश

                  'उत्तरप्रदेश'- हे नाव ऐकलं कि सर्वप्रथम आपल्या नजरेसमोर येतो तो जगातील ७ आश्चर्यापैंकी एक जगप्रसिद्ध असलेला आग्र्याच्या ताजमहाल आणि पेठा. तसे पाहता लहानपणी भूगोलात या राज्याची तोंडओळख ही झालीच होती.लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य म्हणून हे सारे पुस्तकातून अनुभवले होते.परंतु उत्तरेच्या स्वारीचा अनुभव अजून एकदाही आला नव्हता आणि तो योग आला गेल्यावर्षी गणेश उत्सवाच्या कालावधीतच दिनांक १९ सप्टेंबर २०१५ रोजी. उत्तरेकडे झेप घेण्याचा माझा पहिलाच अनुभव होता. उत्तरेचे सांस्कृतिक वैभव प्रथमच अनुभवणार होतो. उत्तर भारतातील कला, संस्कृती, ऐतिहासिक वारसा, लोकांचे राहणीमान हे सारे अनुभवण्याची संधी होती. गणेशचतुर्थी नंतर अगदी दोनचं दिवसात Pune- Patna एक्सप्रेसने पुण्याहून प्रयाण झाले.
                मुक्काम ३ महिन्यासाठी असल्याने सर्व तयारीनिशी निघालो होतो(अर्थात उत्तरेत फार थंडी असते). साधारणतः २४ तासाच्या प्रवासानंतर अलाहाबादला पोहचलो आणि गणेश उत्सवाचा कालावधी असल्याने वातावरण अगदी प्रसन्न होते. आणि तसेच ऑफिसमधे गणपतीची आरती माझ्या हस्ते संपन्न व्हायची तो अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय होता.सप्टेंबर महिन्यात नुकतीच थंडीची चाहूल लागली होती आणि अश्या थंडीत आठवण येते ती म्हणजे वाफाळलेल्या चहाची. चहा सर्व्ह करण्याची नवी पद्धत येथे अनुभवास मिळाली ती म्हणजे मातीच्या कपमध्ये 'चहा serving'. वाफाळलेला चहा आणि गुलाबी थंडी अश्या विविध छबी टिपण्याचा मोह मला आवरता आला नाही. दसरा आणि दिवाळी हे दोन्ही सण माझे इथेच साजरे झाले. दसऱ्याला येथे मोठ्या प्रमाणात रावणदहन व शोभेचे दारुकाम केले जाते. या शोभेच्या दारूकामाने सांगोल्याच्या अंबिकादेवी मंदिराच्या यात्रेतील शोभेच्या दारूकामाची आठवण करून दिली.
                 दसऱ्यानंतर थंडी अगदी जोर पकडू लागली होती. त्यामुळे वाराणसी काशी अगदी ४ तासांच्या अंतरावर असून देखील आम्हाला तेथे जाता आले नाही. परंतु अलाहाबाद येथील गंगा यमुना त्रिवेणी संगम पाहता आला. तसेच उत्तरप्रदेशातील भौगोलिक सांस्कृतिक दृष्टीकोनासोबत खाद्यसंस्कृतीचा पुरेपूर आस्वाद घेतला. साधारणतः डिसेंबर महिन्यात थंडीचा जोर खुप वाढला होता तापमान अगदी ९℃ पर्यंत पोहचले होते. आणि याचवेळी एके दिवशी सकाळी भारताचा राष्ट्रीय पक्षी 'मोर' याचे ही दर्शन झाले. गुलाबी थंडी व धुके यामध्ये हरवलेला निसर्गाच्या विविध छटा टिपण्याचा अनुभव विलक्षण होता.
              अश्या तऱ्हेने साऱ्या आठवणी मनात साठवुन व पुढील यात्रेच्यावेळी वाराणसी काशीला भेट देण्याच्या निश्चयाने दिनांक २२ डिसेंबर २०१५ रोजी अलाहाबादहुन मुंबईसाठी प्रस्थान केले. अश्या तऱ्हेने उत्तरेच्या स्वारीचा पहिलाच अनुभव यशस्वी झाला होता.

Friday, 2 December 2016

Travel Diaries-3 Basar, Telangana

               पूर्वीच्या काळी लहान मुलांच्या शिक्षणाचा शुभारंभ हा 'अक्षरअभ्यासमं किंवा विद्यारंभम' द्वारे (Akashara Abhyasam/ Vidyarambham) केला जात असे. सध्या हि परंपरा भारतात कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या भागात प्रचलित आहे. तर 'अक्षरअभ्यासमं' म्हणजे नेमके काय असा तुम्हाला प्रश्न पडला असेल?
               तर 'अक्षरअभ्यासमं' हा एक धार्मिक पारंपारिक कार्यक्रम आहे ज्यात विद्येची देवता सरस्वती देवी यांची पूजा केली जाते व बालकाच्या शिक्षणाचा शुभारंभ केला जातो ज्यायोगे ते मुल पुढील शिक्षण घेण्यास तयार होते. अक्षरं म्हणजे मुळाक्षरे आणि अभ्यासमं म्हणजे अभ्यास थोडक्यात 'मुळाक्षरांचा अभ्यास'. 'ओम' हे साधारणपणे बीजाक्षर मानले जाते बीज (हा संस्कृत शब्द) म्हणजे मुळ. अर्थात अक्षरअभ्यासमंसाठी बासर मधील गोदावरी व मांजरा नदीच्या संगम तीरावर वसलेले सरस्वती मंदिर हे संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. येथे हा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा  केला जातो. सरस्वती देवी हि बुद्धी व ज्ञान यांची देवता आहे. हे भारतातील सर्वात प्राचीन असे मंदिर आहे.

बासर:
          बासर हे पूर्वीच्या आंध्रप्रदेश व सध्या तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्ह्यातील एक छोटेसे गाव आहे. बासर हे विद्येची देवता सरस्वती मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. भारतात फक्त दोनचं सरस्वती मंदिरे आढळतात एक तेलंगणा आणि दुसरे जम्मु काश्मीर. बासर हे साधारणपणे निझामाबाद पासून ३४.८ किमी, निर्मल पासून ७० किमी आणि हैदराबाद पासून सुमारे २०५ किमी अंतरावर वसले आहे.

● मंदिराचा इतिहास :
              हिंदू पुराणानुसार असे सांगितले जाते कि ज्या ठिकाणी महर्षी वेदव्यास यांनी तपस्या केली होती तेथे सरस्वती मंदिर बनले आहे या मंदिराचे निर्माण कार्य चालुक्य राजाच्या काळात झाले. हे मंदिर 'अक्षर अभ्यासमं' साठी प्रसिद्ध आहे. हि एक प्राचीन परंपरा बालकांच्या जीवनातील शैक्षणिक शुभारंभाची औपचारिकता सूचित करतो.

● सध्याचे मंदिर :
            संपुर्ण मंदिर परिसरातील वातावरण हे धार्मिक व शांतताप्रिय आहे. दसरा व महाशिवरात्री हे मुख्य उत्सव आहेत. सरस्वती, महालक्ष्मी आणि कालीमाता यामुळे बासर येथे नदीच्या संगमाबरोबरच भक्तीचा संगम देखील झाला आहे.

वाहतुक दळणवळण :
             'ज्ञान सरस्वती मंदिर', बासर हे तेलंगणाची राजधानी हैदराबाद पासून २०५ किमी अंतरावर असून TSRTC परिवहनच्या बसेस तसेच रेल्वे हैदराबाद पासून सहज उपलब्ध होतात. महाराष्ट्रवासीयांसाठी तर पंढरपूर-निझामाबाद (वाया बासर) हि थेट ट्रेन उपलब्ध आहे.
            
तर बासरमधील सरस्वती मंदिरास नक्की भेट द्या.

साभार : www.basartemple.org

Sunday, 9 October 2016

Travel Diaries-2 Sikkim- Where Nature Smiles

आज बऱ्याच दिवसांनी लिहिण्याचा योग आला. आत्तापर्यंत मी भेटी दिलेल्या १२ राज्यांपैकी सिक्कीमला दिलेली भेट हि अविस्मरणीय ठरली. अचानक ठरलेला बेत, १५ ऑगस्टचे औचित्य साधुन भारत-चीन सीमेवर सैनिकांशी साधलेला संवाद आणि कैलास सरोवर येथे शिवलिंग दर्शन हे या प्रवासाचे वैशिष्ट्य ठरले.
                चला तर मग जाणून घेऊयात सिक्कीम विषयी. सिक्कीम हे उत्तर-पूर्व भारतात वसलेलं आणि भूतान, नेपाळ ,तिबेट यांच्या सीमांनी बंधिस्त असं एक छोटस राज्यं आहे. म्हणतात ना मुर्ती लहान पण किर्ती महान हे अगदी सिक्कीमच्या बाबतीत तंतोतंत लागू होत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान राज्य परंतु येथील हवामान, निसर्ग सौदर्य यांच्या जोरावर सिक्कीम पर्यटन क्षेत्रात अग्रेसर आहे. सिक्कीमला Switzerland of India असे संबोधले जाते. निसर्गाचे वरदान लाभलेले असे हे सिक्कीम राज्य.
                                                                 Welcome to Sikkim 
                 आता मुख्य मुद्या कडे वळुयात. 

१४ ऑगस्ट २०१६:
                          ठरलेल्या Planning प्रमाणे आम्ही Siliguri (West Bengal) ला पोहचलो कारण Siliguri हुन Gangtok आणि Darjeeling ला जाण्यासाठी NBSTC (North Bengal State Transport Corporation) च्या बसेस किंवा खाजगी वाहने सहज उपलब्ध होतात. Siliguri- Gangtok हे अंतर जरी फक्त ११४ किमी असले तरी डोंगररांगातून जाणारा रस्ता,नदी नाले घाट ओलांडत Gangtok ला पोहचण्यास तब्बल ४ तासांचा अवधी लागतो. तसेच ९० टक्के डोंगररांगातून जातो तसेच रस्यांच्या समांतर वाहणारी Teesta नदी आणि तिचा तो खळखळणारा प्रवाह पाहून मन अगदी थक्क होते. परंतु मध्यंतरावर NHPC चा Hydraulic Power Plant असल्याने तेथून पुढे नदीचा वेग मंदावतो. निसर्ग सौन्दर्याचा आनंद घेत आणि सिक्कीमची खासियत असणारे Veg Momoes चा आस्वाद घेत Gangtok ला पोहचलो. 

                                                 A View of beautiful  Teesta River 
                  
                       Gangtok हि सिक्किमची राजधानी आणि डोंगर रांगात वसलेलं एक शहर आणि सोबत आल्हाददायक वातावरण म्हणजे दुग्ध शर्करा योगच. Rope Way मधून Gangtok शहराचा नजारा अगदी मनमोहक होता तर Flower Exhibition मध्ये काही फुले प्रथमच पाहावयास मिळाली. तर Ganesh- tok हे गणपती मंदिर, Plant Conservatory हि सारी प्रेक्षणीय स्थळे पाहण्यास एक दिवस पुरेसा आहे. 
                                               Gangtok- डोंगररांगांच्या कुशीत वसलेलं शहर 

            यानंतर आमच्या प्रवासातला पुढील बेत होता तो India- China border अर्थातच Natu La हा बेत दुसऱ्यादिवशी असल्याने संध्याकाळी Gangtok च्या आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेता आला. येथील एका गोष्टीचे मला फारच कौतुक वाटले ते म्हणजे वर्षभर थंड हवामान असल्याने येथे पंखा आणि Air Conditioner ची गरज भासत नाही व Fan साठी point नाही  हे विशेष. अश्या या थंड वातावरणात पुढच्या ऐतिहासिक दिवसाचा विचार करीत निद्रिस्त झालो. 

१५ ऑगस्ट २०१६:
                          प्रसन्न सकाळी आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे लाल किल्यावरील राष्ट्राला संबोधणारे श्रवणीय असे भाषण आणि झेंडावंदन हा TV वरील कार्यक्रम आटोपून आम्ही Nathu La कडे प्रस्थान केले. (हा कायर्क्रम पाहताना डोळ्यासमोर शालेय जीवनातला झेंडावंदन सोहळा हळुवार प्रकट झाला). 
                    Gangtok (६००० feet above sea level )- Nathu La (१५१४० feet ) हे ४९ किमी चे अंतर म्हणजे अप्रतिम निसर्ग सौंदर्याचा नमुनाच. थंड हवामान, ऊन सावल्यांचा खेळ आणि नागमोडी वळणाचे रस्ते हे इथले वैशिष्ट आणि हो उल्लेखनीय गोष्ट म्हणजे BRO (Border Roads of  Organisation) ज्यांनी ह्या अतिशय दुर्गम भागात Roads बनविले खरोखर ते कौतुकास पात्र आहेत. 
                               Roads constructed by BRO (Border Roads of Organisation)

                                                           Mini Kailash Sarovar

                       साधारण सकाळी ११:३० वाजता आम्ही सीमेवर पोहचलो व तिथे आपल्या देशाचे Real Heroes, सैनिकांना भेटुन खऱ्या अर्थाने एक अविस्मरणीय स्वातंत्रदिन साजरा करण्याचे भाग्य आम्हास लाभले आणि श्रावण सोमवार असल्याने मिनी कैलास सरोवर येथे शिवलिंग दर्शन घेऊन प्रसन्न मुखाने पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो. 
                      सिक्कीम यात्रा सुफळ संपुर्ण.
                       जय हिंद जय भारत..... !!!
                
                  
               

Sunday, 17 July 2016

Travel Diaries-1 Tirumala Tirupati Devasthanam

नमस्कार,
                       आज आपल्यासमोर माझा पहिलावाहिला ब्लॉग प्रसिद्ध करण्यात मला अत्यंत आनंद होत आहे. मला लहानपणापासूनच प्रवासाची अत्यंत आवड आहे नवनवीन स्थळांना भेटी देणे ,तेथील संस्कृतीचा अभ्यास  करणे आणि तेथील विविध क्षण कॅमेऱ्यामध्ये टीपणे हा माझा आवडीचा छंद आहे.
                        लहानपणापासून खुप ठिकाणी प्रवासाचा योग आला तो कधी कामानिम्मित तर कधी सहलीच्या रूपाने त्यामुळे आजपर्यंत जवळ जवळ निम्मे भारत दर्शन घडले आहे. आज मी त्यातल्याच एका प्रवासाचे वर्णन करीत आहे ते म्हणजे "जगप्रसिद्ध बालाजी मंदिर तिरुमला तिरुपती देवस्थानचं." तिरुपतीला जाण्याचा योग आला तो दिनांक ०६ /०६ /२०१४  रोजी. त्याच्या आधी २ दिवस इंजीनीरिंगच्या तिसऱ्या वर्षाची परीक्षा संपल्यामुळे मूड अगदी रिलॅक्स होता. शिवाय तिरुपतीला जायचं हे  १ महिना आधीच  ठरलं होता आणि सोबतीला शालेय सवंगडी होते त्यामुळे मन अगदी प्रफुल्लित होतें. ठरल्याप्रमाणे ०६ तारखेला आम्ही सांगोल्याहून मिरज रेल्वे स्थानकात पोहचलो. प्लॅटफॉर्मवर  कोल्हापूर-तिरुपती (हरिप्रिया एक्सप्रेस) अगदी दिमाखात हजर होती.
17416/KOP- TPTY Haripriya Express at Miraj Railway Station

                 दुपारी १. ३० वाजता आम्ही मिरजहून प्रस्थान केले. सोबतीला शालेय जीवनातले मित्र असल्यामुळे आणि सर्वजण १२वी नंतर खुप दिवसाने एकत्र भेटत असल्यामुळे प्रवासास एक वेगळीच रंगत आली. तसे पाहिल्यास मिरज ते तिरुपती हे अंतर जवळपास ९०३ किमी म्हणजेच साधारणपणे २० तासांचे आहे पण विविध गप्पा गोष्टी आणि अनेक छबी टिपण्यात कसा वेळ गेला हे कळलंच नाही.

                            हुबळी पासून पुढे लोंढा स्थानकांकडे जातांना वाटेत क्रॉसिंगला टिपलेला एक क्षण

                    एक एक स्थानकं बेळगावी-हुब्बळी-होसपेठे -बेल्लारी-गुंटकल -कडपा -रेणीगुंटा असे कर्नाटकातून आंध्रप्रदेशात प्रवेश केला आणि सकाळी ९ वाजता तिरुपती स्थानकात पोहचलो. भूक लागल्यामुळे लागलीच साऊथ इंडिअन पदार्थावर ताव मारला आणि पुढे मार्गस्थ झालो.
                     तिरुपती ते तिरुमला हे ११. २ किमीचे अंतर आम्ही चालत पार करणार असल्याने त्या दृष्टीनें निघालो वास्तविक हे अंतर २०. ८ (by रोड )किमी आहे पण चालत म्हणजेच जवळपास ३५०० पायऱ्या पार करत आम्ही निघालो. वाटेत झूलॉजिकल पार्क, Deer park आणि विविध निसर्ग सौंदर्य दृष्टीस पडते .
         
   



 Shree Venkateswara Zoological Park
 तेथीलच हा एक क्षण :





Step No. 2567
Distance To Tirumala- 6.20 Km 






               
                             
                        वाटेतच आंध्रप्रदेश सरकारची बस गाठ पडली,
                                             
                                               APSRTC BUS (तिरुपती-तिरुमला -तिरुपती )

                  अशारितीने  ३५०० पायऱ्या चालत  पार करत "श्रीनिवासा गोविंदा" या नामाचा जयघोष  करीत डोंगररांगांमधील वाटेने साधारण ४ तासात  तिरुमला म्हणजेच बालाजी मंदिरात पोहचलो. रांगेमधुन  पुढे सरकत "श्रीनिवासा गोविंदाsss..गोविंदा" असा नामघोष करित अखेर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात  पोहचलो आणि श्री बालाजींचे दर्शनं घेऊन मन अगदी तृप्त झाले व खुप दिवसापासून असलेले दर्शनाचे स्वप्न पुर्ण झाले.
Lord Tirupati Balaji (Source- Internet)

                        त्यानंतर पद्मावती देवीचे दर्शनं घेऊन आम्ही Shree Lakshmi Narayani Golden Temple, Vellore कडे रवाना झालो. Velloreला जाताना तामिळनाडूच्या संस्कृतीचे दर्शन घडले. सुवर्ण मंदिराचे दर्शन आटोपुन पुन्हा आम्ही तिरुपती रेल्वे स्थानकात पोहचलो आणि रात्री ९. ०० वाजता १७४१५/तिरुपती -कोल्हापूर (हरिप्रिया एक्सप्रेस) ने कोल्हापूर कडे निघालो.
                                                 हुब्बळी रेल्वे स्थानकांत काढलेला एक फोटो 
                             17415/TPTY-KOP Haripriya Express at Hubbali Railway Station

                                                   Kolhapur Mahalaxmi Devasthanam 

                      अखेर दुसऱ्या दिवशी  कोल्हापुरात पोहचल्यानंतर महालक्ष्मी देवींचे दर्शनं घेऊन आम्ही सांगोल्याकडे मार्गक्रमण केले.
                                                      Shree Mahalaxmi Devi Kolhapur

                          अशारितीने ६ दिवसाच्या प्रवासात आम्ही विविध संस्कृती,प्रदेश,भाषा चालीरीती यांचा अनुभव घेतला आणि सर्वजण मित्रमंडळी बरेच दिवसातुन भेटल्यामुळें आमचा प्रवास अगदी आनंदाचा आणि  सुखकर झाला.
                          अशातऱ्हेने कहाणी सुफळ संपुर्ण. धन्यवाद .
पहिलाच ब्लॉग असल्यानें काही चुकले असल्यास क्षमस्व.

आठवणी शाळेच्या..!!!

               लिंबाचे लोणचे मुरले म्हणजे त्याला आंबट गोड रुचि येते! आयुष्यातल्या जुन्या आठवणीही अश्याच.... !!!               शाळेत रोज सक्...