Saturday, 30 December 2017

आठवणी शाळेच्या..!!!

               लिंबाचे लोणचे मुरले म्हणजे त्याला आंबट गोड रुचि येते! आयुष्यातल्या जुन्या आठवणीही अश्याच.... !!!
              शाळेत रोज सक्तीने जाणं,अभ्यास करणं हे फार मजेशीर वाटायचं त्यावेळी. परंतू आता नोकरी, नेहमीची धावपळ यापेक्षा आपल्या शाळेची दंगामस्ती पुन्हा अनुभवता यावं असंच फार वाटू लागलंय आता. ते मैदान..आमचे वर्ग..बाई.. फळा-डस्टर..विशिष्ट चालीत वाजणारी घंटा, शाळा भरल्याची अगर संपल्याची जाणीव करून द्यायची. सकाळच्या स्वच्छ कपड्यांची, संध्याकाळी मातीच्या रंगाशी स्पर्धा चालायची. मोठ्या उत्साहाने सकाळी शाळेत आगमन व्हायचं आणि शाळेत शिकवलेल्या धड्यांचा परिणाम मूडवर होऊन त्याच मूडमध्ये संध्याकाळी घरी यायचो. अशा सगळ्या-सगळ्यांची मनात गर्दी होते आणि पुन्हा शाळेत जावं वाटू लागतं.
               शाळेची एखादी इमारत ही फक्त वास्तू नसते तर संस्कारांचे बाळकडू पाजत पंखांमध्ये बळ देण्याचं काम ती करत असते. अशीच काहीशी आमची उत्कर्ष शाळा..म्हणजेच माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान सांगोला.शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारी माझी शाळा. 


                 अश्याच माझ्या शाळेच्या गोड आठवणी आहेत. शाळेत होणारे विविध विषयांचे तास आणि ते शिकवणाऱ्या बाई अजूनही स्मरणात आहेत.एखाद्या विषयाच्या बाई मजेशीर असल्या की तास मजेत जायचा, कधी संपायचा ते कळायचंच नाही. तोच एखादा कंटाळवाणा विषय असला की पुस्तकातली व्यक्तिमत्त्वं रंगीत होऊ लागत किंवा मग वहीचं शेवटचं पान भरायला सुरूवात व्हायची. तासाला आपल्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही की कसंतरी व्हायचं. बरोबर उत्तर दिलं की हवेतून फेरफटका व्हायचा. विषयाचे तास ठिकठाक असले तरी मज्जा यायची ती चित्रकला आणि कार्यानुभवाच्या तासाला. शिवणकाम काय, कागदाच्या वस्तूच काय बनवायचे...क्रिएटिव्हिटीची शेतीच चालायची. यांच्या बरोबरीने असणारा शा.शि (शारीरिक शिक्षण) म्हणजे पांढरा रंग किती बदलू शकतो याचा प्रत्यय आणून देणाराच. जमवलेले खडूचे, खोडरबराचे, पेन्सिलीचे तुकडे, कागदी रॉकेटस एकमेकांना मारताना जबर मजा यायची. पुस्तकं, कंपासपेट्या इतकंच काय तर अगदी दप्तरं लपवण्याचे प्रकारही बिनदिक्कतपणे सुरू असायचे. शिक्षेची मात्र जबर भीती वाटायची. हातावर आडवी किंवा उभी पट्टी मारणं, वर्गाबाहेर, भिंतीकडे तोंड करून उभं राहणे, शिक्षकांच्या बाजूला खाली जमिनीवर बसणं, ग्राउण्डला फेऱ्या मारणं, माहितीपुस्तकात 'मी असं परत कधी करणार नाही' हे लिहून त्यावर आई-वडिलांची स्वाक्षरी आणणं, एखादा धडाच लिहून आणणं हे प्रकार अनुभवताना काय हालत व्हायची ज्याची त्यालाच ठाऊक.


                    विषय कुठलाही असो, पुस्तकातल्या चित्रांवर चित्रकलेचा तास सुरू व्हायचा.धड्यांमध्ये नको नको ते शब्द घालून किंवा काही अनावश्यक शब्द गाळून विषय नीट समजून घेतला जायचा. शाळेचं भव्य पटांगण, ती घंटा, फळा, खडू, डस्टर, शाळा भरल्यावर (किंवा सुट्टी संपल्यावर) लागणारी रेकॉर्ड , नंतर होणारी प्रार्थना, मौन, ध्वनिक्षेपकावरून सादर केले जाणारे कार्यक्रम, ओळीने होणारे कमी-अधिक कंटाळवाणे तास,तासाला चालणाऱ्या घडामोडी, चिडवाचिडवी, भांडणं, परेड , व्यायामप्रकार, मोठ्याने म्हटलेल्या कविता, पाठ केलेली वृत्तं, श्लोक, सुट्टीतले डबे, हरवलेल्या कंपासपेट्या , वॉटरबॅग्ज, वह्या, पुस्तकं, पेनं, पेन्सिलीचे, खोडरबरांचे तुकडे, रंगवलेल्या भिंती, त्यावर लिहिलेले 'सुविचार', चित्रकलेच्या तासाला काढलेली व्यंगचित्रं, कार्यानुभवाच्या तासात घेतले जाणारे वेगळेच अनुभव, दरवर्षी निघणाऱ्या सहली, वाषिर्कोत्सव , क्रीडामहोत्सव,वक्तृत्वस्पर्धा, नाट्यस्पर्धा, विज्ञान मंडळ, प्रश्नमंजुषा, अपूर्ण गृहपाठ,आपल्या चुकीमुळे दुसऱ्याने भोगलेल्या शिक्षा, होणाऱ्या पालकसभा , केल्या जाणाऱ्या तक्रारी, मॉनिटरबरोबरची भांडणं, अभ्यासाचं, मार्कांचं, परीक्षेचं टेन्शन..परंतु शाळा सुटली आणि हे सारं काही सुटलंच...पण सुटताना त्या चालीत वाजणाऱ्या घंटेच्या टण् टण् मधला शेवटचा टण् मात्र अजूनही कानात घुमतो आहे.

Saturday, 1 April 2017

Darjeeling- एक अनोखा पर्यटनानुभव

पर्यटनाबाबत, प्रवासाबाबत असं म्हटलं जातं की काहीवेळा जिथे पोहोचायचं आहे त्या डेस्टिनेशनपेक्षाही, त्यासाठी केलेला प्रवास अधिक सुंदर, स्मरणीय आणि मनमोहक असतो. असंच काहीसा माझा अनुभव होता तो दार्जिलिंग बाबतीत. चहाचे मळे, घाटमाथा, निसर्ग सौन्दर्य, डोंगर रांगांच्या कुशीत वसलेली छोटी शहरे हे सारे निसर्गाचे वरदान अनुभवत दार्जिलिंगला पोहचणे हा एक स्वप्नवत अनुभव होता.
                                                         Welcome to Darjeeling 
  • दार्जिलिंग विषयी थोडक्यात:                                                                                                               दार्जिलिंग हे उत्तरपूर्व  भारतातील पश्चिम बंगाल मधील एक महत्वाचे थंड हवेचे ठिकाण असून त्यासोबतच येथील दर्जेदार चहा देखील जगप्रसिद्ध आहे. येथील आल्हाददायक वातावरण पर्यटकांना खूप भावते. दार्जिलिंग पासून बागडोगरा हे जवळचे विमानतळ आहे. तर न्यू जलपाईगुडी (NJP) हे जवळचे सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे . या दोन्ही  ठिकाणाहून दार्जिलिंग ला पोहचण्यास ३ तासाचा  अवधी लागतो. दार्जिलिंग शहर हे ब्रिटीशानी इ. स. १८०० च्या सुमारास वसवले आणि आणि काळानुरूप सुगंधित चहा, हिमालयीन रेल्वे यासाठी प्रसिध्द पावले.                                                                                                                                        View of Kanchenjunga 
     
  • पर्यटन विषयक:                                                                                                                                  निसर्ग सौन्दर्याने नटलेल्या दार्जिलिंग हे पर्यटनाची खाण आहे. येथे अगणित पर्यटन स्थळे आहेत जसे कि बर्फाने आच्छादलेला कांचनजंगा (जगप्रसिद्ध माऊंट एव्हरेस्ट येथेच आहे), बौद्ध मंदिरे, ऐतिहासिक चर्च, मंदिरे,  डोंगर रांगांच्या उतारावरील चहाचे मळे, संग्रहालये, कला दालने, बाग बगीचे, धबधबे आणि  केबल कारची स्वारी मधून अप्रतिम पर्वत रांगा उतारावरील चहाच्या मळ्यांचा अद्भुत नजारा आणि बरंच  काही..... 
           Clock Tower
  • दार्जिलिंग हिमालयीन रेल्वे- टॉय ट्रेन                                                                                                   दार्जिलिंग हिमालयीन रेल्वे अर्थातच टॉय ट्रेनची सुरुवात १८८१ साली ब्रिटिशानीं केली. त्या काळात बैलगाडी, घोडेस्वारी याला पर्याय म्हणून टॉय ट्रेनची सुरुवात झाली. पूर्वी सिलिगुडी ते दार्जिलिंग असा हा नॅरो गेज मार्ग सध्या फक्त दार्जिलिंग शहरात कार्यरत आहे. येथे येणारा प्रत्येक पर्यटक याच्या प्रेमात पडल्या शिवाय रहात नाही. नागमोडी वळणे, छोटी शहरे  आणि सोबतच निसर्ग सौन्दर्याचा आनंद या ट्रेन मध्ये घेता येतो. 
Heart of Darjeeling- "Darjeeling Himalayan Railway/Toy Train
  • दार्जिलिंग चहा-                                                                                                                              दार्जिलिंग विषयी बोलणे हे चहाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. जगाच्या नकाश्यावर दार्जिलिंग हे चहा साठीच प्रसिद्ध आहे. 'चहा' हे असे एक उत्साहवर्धक पेय जे प्रत्येक भारतीयाच्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे. माझ्या भेटी दरम्यान अनेक चहाच्या मळ्यांना भेटी दिल्या आणि चहाचा मनमुराद आस्वाद घेतला. गुणवत्तेनुसार येथे चहाचे विविध प्रकार आढळतात. त्यांची किंमत साधारणपणे ७०० रु/किलो ते  ५०,००० रु/किलो आहे. 
World Famous Tea Garden
  • हवामान:                                                                                                                                         दार्जिलिंगला जाण्याचा सर्वोत्तम काळ कोणता? याचे उत्तर हे तुम्हाला काय आणि कशाचा आनंद घ्यायचा आहे यावर अवलंबून आहे. काही जण कांचनजंगाचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी आणि उष्ण वातावरणातून बचाव करण्यासाठी उन्हाळ्यात दार्जिलिंगला येतात. तर काही बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी हिवाळ्यात येतात तर काही जण मान्सूनचा आनंद घेण्यासाठी पावसाळ्यात येतात. 
                                                      Snow Fall on 15th January 2017
  • ट्रेकिंग:                                                                                                                                          जर तुम्ही ट्रेकिंगचे शौकिन असाल आणि निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर दार्जिलिंग पर्वत रांगांमधील ट्रेकिंगचा आनंद जरूर घ्या. विविध पर्वत रांगांमधून, जंगलातून ट्रेकिंगचा मनमुराद आनंद घेता येतो.     
  • वाहतूक व दळणवळण-                                                                                                                  
१) विमानप्रवास: जवळचे विमानतळ- बागडोगरा (बागडोगरा- दार्जिलिंग ९४ किमी ३.५ तास)
२) रेल्वेप्रवास: जवळचे रेल्वे स्थानक- सिलिगुडी (SGUJ ), न्यु जलपाईगुडी (NJP)
३) सिलिगुडी हुन खाजगी वाहने देखील उपलब्ध आहेत. (सिलिगुडी- दार्जिलिंग ६५ किमी २ तास)                                                                                                                                                                                         शेवटी मला इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते कि तुम्ही जगात कुठेही असाल तरी एक वेळ अवश्य दार्जिलिंगला भेट द्या.





Thursday, 12 January 2017

।।जीवन करि जीवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म।।

शाकंभरी पौर्णिमा

नमोनमः।
पौष पौर्णिमा, श्रीशाकंभरी पौर्णिमा. अर्थातच भगवती शाकंभरीमातेचा अवतार दिवस  !!
शाक म्हणजे भाजीपाला व भरी म्हणजे भरण-पोषण करणारी. तिने स्वत:च्या देहातून अनेक भाज्या, धान्य इत्यादी खाद्यसामग्री निर्माण केली व पृथ्वीवरील जीवन अबाधित राखले. तेव्हापासून या तिथीला उपलब्ध सर्व भाज्या, फळे यांचा नैवेद्य दाखवून आई जगदंबेची पूजा केली जाते.प्रत्यक्ष जगदंबेच्या शरीरातूनच अन्नधान्य, भाजीपाला निर्माण झालेला आहे. म्हणजे अन्न हे तिचेच स्वरूप आहे. आपल्याकडे लहानपणापासून अन्नाचा आदर करण्याचे, त्याला पूर्णब्रह्म मानून सेवन करण्याचे संस्कार केले जातात, ते उगीच नाही  !!
आजच्या या पावन दिनी, ब्रह्मस्वरूप अशा अन्नाचे सुयोग्य महत्त्व मनावर ठसावे, यासाठी एक लेख पोस्ट करीत आहे.
                "अन्नं बहु कुर्वीत । अन्नं ब्रह्मेति व्यजानात् ।  अन्नं न निन्द्यात् ।" असा गौरवपूर्ण विचार मांडणारी  आमची ऋषीप्रणित भारतीय  संस्कृती  ! अन्नाला नावे ठेवू नयेत. अन्न भरपूर करावे, पात्रापात्र न पाहता सर्व गरजवंतांना अन्न द्यावे. अन्न ब्रह्मरूपच मानावे. एक शीत देखील वाया घालवू नये; असे आवर्जून बिंबवणारी आमची भारतीय संस्कृती काळाच्या उदरात गुडुप झालीये की काय? पौराणिक कथेत का होईना, पण एक तीळ सात जणांमध्ये वाटून खाण्याचा आदर्श वस्तुपाठ आमच्या मनावर उमटवणारी आमची संस्कृती श्रेष्ठ आहे, हे विसरून चालणार नाही !
                 जीवनरूपी ग्रंथाचे आद्य भाष्यकार, भगवान श्री ज्ञानदेवांची एक सुंदर श्रुती आहे. भगवद्गीतेचा शिष्ट संप्रदाय सांगताना ते अर्जुनाला म्हणतात,
धालिया दिव्यान्न सुवावें ।
मग जे वाया धाडावें ।    
तें आर्तीं कां न करावें ।
उदारपण ॥
॥ ज्ञाने.१८.६७.१९४३ ॥
                ज्याचे पोट भरलेले आहे त्यालाच पुन्हा प्रसादाचे दिव्य अन्न खाण्याचा आग्रह करावा आणि एक प्रकारे ते दिव्यान्न वाया घालवावे; यापेक्षा ज्याला गरज आहे, ज्याला अन्न मिळतच नाही किंवा जो दोनवेळच्या पोटभर जेवणाला मोताद आहे, त्याला का तुम्ही हे तुमचे उदारपण दाखवत नाही? माउलींच्या या प्रश्नाचे आपल्यापैकी कितीजण योग्य उत्तर देऊ शकतील?
                माझी एक कळकळीची विनंती आहे सर्वांना ! अन्नाचे महत्त्व वेळीच ओळखा व आपल्या मुला-बाळांनाही योग्य वयात ते महत्त्व असे बिंबवा की मरेपर्यंत कधीच विसरता कामा नये. कोणतेही अन्न हे भगवंतांच्या कृपेनेच समोर येते, त्याला नावे ठेवू नयेत. आवडीचे नसले तरी न कुरकुरता खावे. एकवेळ खाल्ले तर काही फरक पडत नाही. आई-वडिलांनी ही सवय स्वतःपासून सुरू करावी. मुले पाहून पाहून आत्मसात करतील. शिवाय आपल्या घासातला एक घास तरी गरजवंताला देण्याची उत्तम सवय लावून घ्यायला हवी. यथाशक्य द्यावे पण देत रहावे. देव भरभरून परतफेड करतातच त्याची !
                  जाता जाता एक फार महत्त्वाचा शास्त्रसिद्धांत सांगतो. संत वाङ्मयाचे थोर अभ्यासक, योगिराज श्री.मामासाहेब देशपांडे महाराज नेहमी सांगत की, "अन्नाचे एक शीत जरी आपल्या माजोरीपणाने किंवा हलगर्जीपणाने वाया घालवले तर त्या प्रत्येक शितासाठी एक आख्खा जन्म अन्नान्नदशेत काढावा लागतो, असे वेदवचनच आहे. म्हणून अन्नाचे महत्त्व ओळखा व चुकूनही कधी त्याची नासाडी होऊ देऊ नका !" हा सद्विचार पक्का ठसणे व त्यानुसारच वागणे, हीच खरी "अन्न सुरक्षा" आहे  !       
                  ही शाकंभरी पौर्णिमा, ब्रह्मरूप अन्नाच्या या भान-जाणीवेच्या स्निग्ध दीपाने उजळवून आपण सर्वजण जाणतेपणाने साजरी करूया व पुढील पिढ्यांसाठीही आदर्श घालून देऊया ! " जीवन करि जीवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म । उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ।।" अशी भाव-जागृती, सर्वांच्या अंतरात बोध-पौर्णिमा साजरी करीत बहरून येवो, हीच याप्रसंगी प्रार्थनापूर्वक शुभकामना !! आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
           
साभार:- लेखक रोहन उपळेकर यांच्या लेखाचा सारांश.

Tuesday, 13 December 2016

श्री क्षेत्र नृसिंहवाडी, कोल्हापूर

।।दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।।
              श्री क्षेत्र नृसिंहवाडी अर्थातच दत्तसंप्रदायाची राजधानी. नृसिंहवाडी हे कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पावन संगमावर वसलेले हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. श्री दत्तगुरूंच्या अवतारामुळे नृसिंहवाडीचा परिसर पावन झाला असून स्वयंभू पादुकांची येथे अखंड पूजा अर्चा चालू असते. श्री दत्त गुरूंचे साक्षात तिसरे अवतार मानले गेलेले श्री नृसिंह सरस्वती यांनी औदुंबर वृक्षांनी बहरलेल्या या अरण्य भूमीत १२ वर्षे वास्तव्य केले व परिसर सुफल केला.
              अमरापुर या नावाने या क्षेत्राचा महिमा गुरुचरित्रात वर्णिलेला आढळतो. श्री नृसिंह सरस्वती औदुंबरचा चातुर्मास संपवून भ्रमंतीस निघाले असता संचार करता करता ते या ठिकाणी येऊन पोहचले त्यावेळी येथे औदुंबर वृक्षाची वनेच वने होती. दत्त भक्तांच्या आग्रहानुसार श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी येथे १२ वर्षे वास्तव्य केले त्यामुळे या क्षेत्राला नृसिंहवाडी अर्थात नरसोबावाडी असे नामाभिधान प्राप्त झाले. स्वामींनीच येथे दत्त पादुकांची स्थापना केली. या क्षेत्राला कृष्णा पंचगंगेच्या संगमामुळे व औदुंबर वृक्षांच्या घनदाट छायेमुळे प्रसन्नता आली आहे व स्वामींच्या वास्तव्याने पावित्र्यात आणखीनच भर पडली आहे.
               कृष्णेच्या प्रशस्त अश्या घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली सुंदर मनमोहक असे मंदिर आहे. वाडीहुन गाणगापूरला जाताना योगिनींच्या आग्रहावरून स्वामींनी वालुकामय पादुकांची स्थापना केली. त्यावरील सततच्या अभिषेकाने त्या झिजत नाहीत म्हणून त्यांची घडण चंद्रकांत पाषाणाची असावी असे म्हणतात. श्री गुरू ज्या औदुंबर वृक्षाखाली बसत असत तो वृक्ष आणि त्याखाली नदीसन्मुख मनोहर पादुका आहेत तसेच जय,विजय व नृसिंह सरस्वती महाराजांची प्रतिमा आहे. मंदिराभोवती मोठा गोलाकार मंडप असून त्याला चार ही बाजूनी उंच विस्तृत खांब आहेत.
              मार्गशीर्ष पौर्णिमेला अर्थात दत्त जयंतीला मोठा सोहळा साजरा केला जातो. याशिवाय नृसिंहजयंती गोपाळकाला उत्सव, श्रीपाद श्री वल्लभ जयंती साजरे केले जातात. दक्षिणद्वार सोहळा अर्थातच साधारणतः जुलै महिन्यात  कृष्णा नदीचे पाणी दत्त पादुकांपर्यंत पोहचते. थोडक्यात कृष्णामाईचं मनोहर दत्त पादुकांच्या अभिषेकासाठी अवतरते. यावर्षी कन्यागत महापर्वकाल हि साजरा होत आहे अर्थात साक्षात गंगा नदी अवतरली ती कृष्णा भेटीसाठी. मनोहर पादुकांचे दर्शन घेऊन या प्रसन्न वातावरणात मन अगदी भक्तीरसात चिंब होते व मंदिर परिसर हा ब्रह्मवृंदांच्या स्तोत्रपठणामुळे भक्तिमय होतो.
               नृसिंहवाडी हे कोल्हापूरपासून ४५ किमी आणि मिरज पासून अवघ्या १९ किमी अंतरावर वसलेले आहे. कोल्हापूरहुन जयसिंगपूर मार्गे तसेच इचलकरंजी, कुरुंदवाड मार्गे नृसिंहवाडीस जाता येते. मिरज व कोल्हापूरहून महाराष्ट्र राज्य परिवहन (MSRTC) मंडळाच्या बसेस सहज उपलब्ध होतात. तसेच निपाणी व चिक्कोडी पासून कर्नाटक राज्य परिवहन (KSRTC) मंडळाच्या बसेस देखील थेट नृसिंहवाडी साठी उपलब्ध आहेत आणि जयसिंगपूर रेल्वे स्थानकापासून अवघ्या १२ किमी अंतरावर नृसिंहवाडी आहे.
                  श्री नृसिंह सरस्वतींच्या पदस्पर्शाने पावन
झालेले असे हे दत्तक्षेत्र नृसिंहवाडी.
                      ।।श्री गुरुदेव दत्त।।

Saturday, 3 December 2016

Travel Diaries-4 स्वारी उत्तरेची, उत्तरप्रदेश

                  'उत्तरप्रदेश'- हे नाव ऐकलं कि सर्वप्रथम आपल्या नजरेसमोर येतो तो जगातील ७ आश्चर्यापैंकी एक जगप्रसिद्ध असलेला आग्र्याच्या ताजमहाल आणि पेठा. तसे पाहता लहानपणी भूगोलात या राज्याची तोंडओळख ही झालीच होती.लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य म्हणून हे सारे पुस्तकातून अनुभवले होते.परंतु उत्तरेच्या स्वारीचा अनुभव अजून एकदाही आला नव्हता आणि तो योग आला गेल्यावर्षी गणेश उत्सवाच्या कालावधीतच दिनांक १९ सप्टेंबर २०१५ रोजी. उत्तरेकडे झेप घेण्याचा माझा पहिलाच अनुभव होता. उत्तरेचे सांस्कृतिक वैभव प्रथमच अनुभवणार होतो. उत्तर भारतातील कला, संस्कृती, ऐतिहासिक वारसा, लोकांचे राहणीमान हे सारे अनुभवण्याची संधी होती. गणेशचतुर्थी नंतर अगदी दोनचं दिवसात Pune- Patna एक्सप्रेसने पुण्याहून प्रयाण झाले.
                मुक्काम ३ महिन्यासाठी असल्याने सर्व तयारीनिशी निघालो होतो(अर्थात उत्तरेत फार थंडी असते). साधारणतः २४ तासाच्या प्रवासानंतर अलाहाबादला पोहचलो आणि गणेश उत्सवाचा कालावधी असल्याने वातावरण अगदी प्रसन्न होते. आणि तसेच ऑफिसमधे गणपतीची आरती माझ्या हस्ते संपन्न व्हायची तो अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय होता.सप्टेंबर महिन्यात नुकतीच थंडीची चाहूल लागली होती आणि अश्या थंडीत आठवण येते ती म्हणजे वाफाळलेल्या चहाची. चहा सर्व्ह करण्याची नवी पद्धत येथे अनुभवास मिळाली ती म्हणजे मातीच्या कपमध्ये 'चहा serving'. वाफाळलेला चहा आणि गुलाबी थंडी अश्या विविध छबी टिपण्याचा मोह मला आवरता आला नाही. दसरा आणि दिवाळी हे दोन्ही सण माझे इथेच साजरे झाले. दसऱ्याला येथे मोठ्या प्रमाणात रावणदहन व शोभेचे दारुकाम केले जाते. या शोभेच्या दारूकामाने सांगोल्याच्या अंबिकादेवी मंदिराच्या यात्रेतील शोभेच्या दारूकामाची आठवण करून दिली.
                 दसऱ्यानंतर थंडी अगदी जोर पकडू लागली होती. त्यामुळे वाराणसी काशी अगदी ४ तासांच्या अंतरावर असून देखील आम्हाला तेथे जाता आले नाही. परंतु अलाहाबाद येथील गंगा यमुना त्रिवेणी संगम पाहता आला. तसेच उत्तरप्रदेशातील भौगोलिक सांस्कृतिक दृष्टीकोनासोबत खाद्यसंस्कृतीचा पुरेपूर आस्वाद घेतला. साधारणतः डिसेंबर महिन्यात थंडीचा जोर खुप वाढला होता तापमान अगदी ९℃ पर्यंत पोहचले होते. आणि याचवेळी एके दिवशी सकाळी भारताचा राष्ट्रीय पक्षी 'मोर' याचे ही दर्शन झाले. गुलाबी थंडी व धुके यामध्ये हरवलेला निसर्गाच्या विविध छटा टिपण्याचा अनुभव विलक्षण होता.
              अश्या तऱ्हेने साऱ्या आठवणी मनात साठवुन व पुढील यात्रेच्यावेळी वाराणसी काशीला भेट देण्याच्या निश्चयाने दिनांक २२ डिसेंबर २०१५ रोजी अलाहाबादहुन मुंबईसाठी प्रस्थान केले. अश्या तऱ्हेने उत्तरेच्या स्वारीचा पहिलाच अनुभव यशस्वी झाला होता.

Friday, 2 December 2016

Travel Diaries-3 Basar, Telangana

               पूर्वीच्या काळी लहान मुलांच्या शिक्षणाचा शुभारंभ हा 'अक्षरअभ्यासमं किंवा विद्यारंभम' द्वारे (Akashara Abhyasam/ Vidyarambham) केला जात असे. सध्या हि परंपरा भारतात कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या भागात प्रचलित आहे. तर 'अक्षरअभ्यासमं' म्हणजे नेमके काय असा तुम्हाला प्रश्न पडला असेल?
               तर 'अक्षरअभ्यासमं' हा एक धार्मिक पारंपारिक कार्यक्रम आहे ज्यात विद्येची देवता सरस्वती देवी यांची पूजा केली जाते व बालकाच्या शिक्षणाचा शुभारंभ केला जातो ज्यायोगे ते मुल पुढील शिक्षण घेण्यास तयार होते. अक्षरं म्हणजे मुळाक्षरे आणि अभ्यासमं म्हणजे अभ्यास थोडक्यात 'मुळाक्षरांचा अभ्यास'. 'ओम' हे साधारणपणे बीजाक्षर मानले जाते बीज (हा संस्कृत शब्द) म्हणजे मुळ. अर्थात अक्षरअभ्यासमंसाठी बासर मधील गोदावरी व मांजरा नदीच्या संगम तीरावर वसलेले सरस्वती मंदिर हे संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. येथे हा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा  केला जातो. सरस्वती देवी हि बुद्धी व ज्ञान यांची देवता आहे. हे भारतातील सर्वात प्राचीन असे मंदिर आहे.

बासर:
          बासर हे पूर्वीच्या आंध्रप्रदेश व सध्या तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्ह्यातील एक छोटेसे गाव आहे. बासर हे विद्येची देवता सरस्वती मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. भारतात फक्त दोनचं सरस्वती मंदिरे आढळतात एक तेलंगणा आणि दुसरे जम्मु काश्मीर. बासर हे साधारणपणे निझामाबाद पासून ३४.८ किमी, निर्मल पासून ७० किमी आणि हैदराबाद पासून सुमारे २०५ किमी अंतरावर वसले आहे.

● मंदिराचा इतिहास :
              हिंदू पुराणानुसार असे सांगितले जाते कि ज्या ठिकाणी महर्षी वेदव्यास यांनी तपस्या केली होती तेथे सरस्वती मंदिर बनले आहे या मंदिराचे निर्माण कार्य चालुक्य राजाच्या काळात झाले. हे मंदिर 'अक्षर अभ्यासमं' साठी प्रसिद्ध आहे. हि एक प्राचीन परंपरा बालकांच्या जीवनातील शैक्षणिक शुभारंभाची औपचारिकता सूचित करतो.

● सध्याचे मंदिर :
            संपुर्ण मंदिर परिसरातील वातावरण हे धार्मिक व शांतताप्रिय आहे. दसरा व महाशिवरात्री हे मुख्य उत्सव आहेत. सरस्वती, महालक्ष्मी आणि कालीमाता यामुळे बासर येथे नदीच्या संगमाबरोबरच भक्तीचा संगम देखील झाला आहे.

वाहतुक दळणवळण :
             'ज्ञान सरस्वती मंदिर', बासर हे तेलंगणाची राजधानी हैदराबाद पासून २०५ किमी अंतरावर असून TSRTC परिवहनच्या बसेस तसेच रेल्वे हैदराबाद पासून सहज उपलब्ध होतात. महाराष्ट्रवासीयांसाठी तर पंढरपूर-निझामाबाद (वाया बासर) हि थेट ट्रेन उपलब्ध आहे.
            
तर बासरमधील सरस्वती मंदिरास नक्की भेट द्या.

साभार : www.basartemple.org

Sunday, 9 October 2016

Travel Diaries-2 Sikkim- Where Nature Smiles

आज बऱ्याच दिवसांनी लिहिण्याचा योग आला. आत्तापर्यंत मी भेटी दिलेल्या १२ राज्यांपैकी सिक्कीमला दिलेली भेट हि अविस्मरणीय ठरली. अचानक ठरलेला बेत, १५ ऑगस्टचे औचित्य साधुन भारत-चीन सीमेवर सैनिकांशी साधलेला संवाद आणि कैलास सरोवर येथे शिवलिंग दर्शन हे या प्रवासाचे वैशिष्ट्य ठरले.
                चला तर मग जाणून घेऊयात सिक्कीम विषयी. सिक्कीम हे उत्तर-पूर्व भारतात वसलेलं आणि भूतान, नेपाळ ,तिबेट यांच्या सीमांनी बंधिस्त असं एक छोटस राज्यं आहे. म्हणतात ना मुर्ती लहान पण किर्ती महान हे अगदी सिक्कीमच्या बाबतीत तंतोतंत लागू होत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान राज्य परंतु येथील हवामान, निसर्ग सौदर्य यांच्या जोरावर सिक्कीम पर्यटन क्षेत्रात अग्रेसर आहे. सिक्कीमला Switzerland of India असे संबोधले जाते. निसर्गाचे वरदान लाभलेले असे हे सिक्कीम राज्य.
                                                                 Welcome to Sikkim 
                 आता मुख्य मुद्या कडे वळुयात. 

१४ ऑगस्ट २०१६:
                          ठरलेल्या Planning प्रमाणे आम्ही Siliguri (West Bengal) ला पोहचलो कारण Siliguri हुन Gangtok आणि Darjeeling ला जाण्यासाठी NBSTC (North Bengal State Transport Corporation) च्या बसेस किंवा खाजगी वाहने सहज उपलब्ध होतात. Siliguri- Gangtok हे अंतर जरी फक्त ११४ किमी असले तरी डोंगररांगातून जाणारा रस्ता,नदी नाले घाट ओलांडत Gangtok ला पोहचण्यास तब्बल ४ तासांचा अवधी लागतो. तसेच ९० टक्के डोंगररांगातून जातो तसेच रस्यांच्या समांतर वाहणारी Teesta नदी आणि तिचा तो खळखळणारा प्रवाह पाहून मन अगदी थक्क होते. परंतु मध्यंतरावर NHPC चा Hydraulic Power Plant असल्याने तेथून पुढे नदीचा वेग मंदावतो. निसर्ग सौन्दर्याचा आनंद घेत आणि सिक्कीमची खासियत असणारे Veg Momoes चा आस्वाद घेत Gangtok ला पोहचलो. 

                                                 A View of beautiful  Teesta River 
                  
                       Gangtok हि सिक्किमची राजधानी आणि डोंगर रांगात वसलेलं एक शहर आणि सोबत आल्हाददायक वातावरण म्हणजे दुग्ध शर्करा योगच. Rope Way मधून Gangtok शहराचा नजारा अगदी मनमोहक होता तर Flower Exhibition मध्ये काही फुले प्रथमच पाहावयास मिळाली. तर Ganesh- tok हे गणपती मंदिर, Plant Conservatory हि सारी प्रेक्षणीय स्थळे पाहण्यास एक दिवस पुरेसा आहे. 
                                               Gangtok- डोंगररांगांच्या कुशीत वसलेलं शहर 

            यानंतर आमच्या प्रवासातला पुढील बेत होता तो India- China border अर्थातच Natu La हा बेत दुसऱ्यादिवशी असल्याने संध्याकाळी Gangtok च्या आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेता आला. येथील एका गोष्टीचे मला फारच कौतुक वाटले ते म्हणजे वर्षभर थंड हवामान असल्याने येथे पंखा आणि Air Conditioner ची गरज भासत नाही व Fan साठी point नाही  हे विशेष. अश्या या थंड वातावरणात पुढच्या ऐतिहासिक दिवसाचा विचार करीत निद्रिस्त झालो. 

१५ ऑगस्ट २०१६:
                          प्रसन्न सकाळी आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे लाल किल्यावरील राष्ट्राला संबोधणारे श्रवणीय असे भाषण आणि झेंडावंदन हा TV वरील कार्यक्रम आटोपून आम्ही Nathu La कडे प्रस्थान केले. (हा कायर्क्रम पाहताना डोळ्यासमोर शालेय जीवनातला झेंडावंदन सोहळा हळुवार प्रकट झाला). 
                    Gangtok (६००० feet above sea level )- Nathu La (१५१४० feet ) हे ४९ किमी चे अंतर म्हणजे अप्रतिम निसर्ग सौंदर्याचा नमुनाच. थंड हवामान, ऊन सावल्यांचा खेळ आणि नागमोडी वळणाचे रस्ते हे इथले वैशिष्ट आणि हो उल्लेखनीय गोष्ट म्हणजे BRO (Border Roads of  Organisation) ज्यांनी ह्या अतिशय दुर्गम भागात Roads बनविले खरोखर ते कौतुकास पात्र आहेत. 
                               Roads constructed by BRO (Border Roads of Organisation)

                                                           Mini Kailash Sarovar

                       साधारण सकाळी ११:३० वाजता आम्ही सीमेवर पोहचलो व तिथे आपल्या देशाचे Real Heroes, सैनिकांना भेटुन खऱ्या अर्थाने एक अविस्मरणीय स्वातंत्रदिन साजरा करण्याचे भाग्य आम्हास लाभले आणि श्रावण सोमवार असल्याने मिनी कैलास सरोवर येथे शिवलिंग दर्शन घेऊन प्रसन्न मुखाने पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो. 
                      सिक्कीम यात्रा सुफळ संपुर्ण.
                       जय हिंद जय भारत..... !!!
                
                  
               

आठवणी शाळेच्या..!!!

               लिंबाचे लोणचे मुरले म्हणजे त्याला आंबट गोड रुचि येते! आयुष्यातल्या जुन्या आठवणीही अश्याच.... !!!               शाळेत रोज सक्...