Saturday, 30 December 2017

आठवणी शाळेच्या..!!!

               लिंबाचे लोणचे मुरले म्हणजे त्याला आंबट गोड रुचि येते! आयुष्यातल्या जुन्या आठवणीही अश्याच.... !!!
              शाळेत रोज सक्तीने जाणं,अभ्यास करणं हे फार मजेशीर वाटायचं त्यावेळी. परंतू आता नोकरी, नेहमीची धावपळ यापेक्षा आपल्या शाळेची दंगामस्ती पुन्हा अनुभवता यावं असंच फार वाटू लागलंय आता. ते मैदान..आमचे वर्ग..बाई.. फळा-डस्टर..विशिष्ट चालीत वाजणारी घंटा, शाळा भरल्याची अगर संपल्याची जाणीव करून द्यायची. सकाळच्या स्वच्छ कपड्यांची, संध्याकाळी मातीच्या रंगाशी स्पर्धा चालायची. मोठ्या उत्साहाने सकाळी शाळेत आगमन व्हायचं आणि शाळेत शिकवलेल्या धड्यांचा परिणाम मूडवर होऊन त्याच मूडमध्ये संध्याकाळी घरी यायचो. अशा सगळ्या-सगळ्यांची मनात गर्दी होते आणि पुन्हा शाळेत जावं वाटू लागतं.
               शाळेची एखादी इमारत ही फक्त वास्तू नसते तर संस्कारांचे बाळकडू पाजत पंखांमध्ये बळ देण्याचं काम ती करत असते. अशीच काहीशी आमची उत्कर्ष शाळा..म्हणजेच माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान सांगोला.शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारी माझी शाळा. 


                 अश्याच माझ्या शाळेच्या गोड आठवणी आहेत. शाळेत होणारे विविध विषयांचे तास आणि ते शिकवणाऱ्या बाई अजूनही स्मरणात आहेत.एखाद्या विषयाच्या बाई मजेशीर असल्या की तास मजेत जायचा, कधी संपायचा ते कळायचंच नाही. तोच एखादा कंटाळवाणा विषय असला की पुस्तकातली व्यक्तिमत्त्वं रंगीत होऊ लागत किंवा मग वहीचं शेवटचं पान भरायला सुरूवात व्हायची. तासाला आपल्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही की कसंतरी व्हायचं. बरोबर उत्तर दिलं की हवेतून फेरफटका व्हायचा. विषयाचे तास ठिकठाक असले तरी मज्जा यायची ती चित्रकला आणि कार्यानुभवाच्या तासाला. शिवणकाम काय, कागदाच्या वस्तूच काय बनवायचे...क्रिएटिव्हिटीची शेतीच चालायची. यांच्या बरोबरीने असणारा शा.शि (शारीरिक शिक्षण) म्हणजे पांढरा रंग किती बदलू शकतो याचा प्रत्यय आणून देणाराच. जमवलेले खडूचे, खोडरबराचे, पेन्सिलीचे तुकडे, कागदी रॉकेटस एकमेकांना मारताना जबर मजा यायची. पुस्तकं, कंपासपेट्या इतकंच काय तर अगदी दप्तरं लपवण्याचे प्रकारही बिनदिक्कतपणे सुरू असायचे. शिक्षेची मात्र जबर भीती वाटायची. हातावर आडवी किंवा उभी पट्टी मारणं, वर्गाबाहेर, भिंतीकडे तोंड करून उभं राहणे, शिक्षकांच्या बाजूला खाली जमिनीवर बसणं, ग्राउण्डला फेऱ्या मारणं, माहितीपुस्तकात 'मी असं परत कधी करणार नाही' हे लिहून त्यावर आई-वडिलांची स्वाक्षरी आणणं, एखादा धडाच लिहून आणणं हे प्रकार अनुभवताना काय हालत व्हायची ज्याची त्यालाच ठाऊक.


                    विषय कुठलाही असो, पुस्तकातल्या चित्रांवर चित्रकलेचा तास सुरू व्हायचा.धड्यांमध्ये नको नको ते शब्द घालून किंवा काही अनावश्यक शब्द गाळून विषय नीट समजून घेतला जायचा. शाळेचं भव्य पटांगण, ती घंटा, फळा, खडू, डस्टर, शाळा भरल्यावर (किंवा सुट्टी संपल्यावर) लागणारी रेकॉर्ड , नंतर होणारी प्रार्थना, मौन, ध्वनिक्षेपकावरून सादर केले जाणारे कार्यक्रम, ओळीने होणारे कमी-अधिक कंटाळवाणे तास,तासाला चालणाऱ्या घडामोडी, चिडवाचिडवी, भांडणं, परेड , व्यायामप्रकार, मोठ्याने म्हटलेल्या कविता, पाठ केलेली वृत्तं, श्लोक, सुट्टीतले डबे, हरवलेल्या कंपासपेट्या , वॉटरबॅग्ज, वह्या, पुस्तकं, पेनं, पेन्सिलीचे, खोडरबरांचे तुकडे, रंगवलेल्या भिंती, त्यावर लिहिलेले 'सुविचार', चित्रकलेच्या तासाला काढलेली व्यंगचित्रं, कार्यानुभवाच्या तासात घेतले जाणारे वेगळेच अनुभव, दरवर्षी निघणाऱ्या सहली, वाषिर्कोत्सव , क्रीडामहोत्सव,वक्तृत्वस्पर्धा, नाट्यस्पर्धा, विज्ञान मंडळ, प्रश्नमंजुषा, अपूर्ण गृहपाठ,आपल्या चुकीमुळे दुसऱ्याने भोगलेल्या शिक्षा, होणाऱ्या पालकसभा , केल्या जाणाऱ्या तक्रारी, मॉनिटरबरोबरची भांडणं, अभ्यासाचं, मार्कांचं, परीक्षेचं टेन्शन..परंतु शाळा सुटली आणि हे सारं काही सुटलंच...पण सुटताना त्या चालीत वाजणाऱ्या घंटेच्या टण् टण् मधला शेवटचा टण् मात्र अजूनही कानात घुमतो आहे.

आठवणी शाळेच्या..!!!

               लिंबाचे लोणचे मुरले म्हणजे त्याला आंबट गोड रुचि येते! आयुष्यातल्या जुन्या आठवणीही अश्याच.... !!!               शाळेत रोज सक्...