शाकंभरी पौर्णिमा
नमोनमः।
पौष पौर्णिमा, श्रीशाकंभरी पौर्णिमा. अर्थातच भगवती शाकंभरीमातेचा अवतार दिवस !!
शाक म्हणजे भाजीपाला व भरी म्हणजे भरण-पोषण करणारी. तिने स्वत:च्या देहातून अनेक भाज्या, धान्य इत्यादी खाद्यसामग्री निर्माण केली व पृथ्वीवरील जीवन अबाधित राखले. तेव्हापासून या तिथीला उपलब्ध सर्व भाज्या, फळे यांचा नैवेद्य दाखवून आई जगदंबेची पूजा केली जाते.प्रत्यक्ष जगदंबेच्या शरीरातूनच अन्नधान्य, भाजीपाला निर्माण झालेला आहे. म्हणजे अन्न हे तिचेच स्वरूप आहे. आपल्याकडे लहानपणापासून अन्नाचा आदर करण्याचे, त्याला पूर्णब्रह्म मानून सेवन करण्याचे संस्कार केले जातात, ते उगीच नाही !!
आजच्या या पावन दिनी, ब्रह्मस्वरूप अशा अन्नाचे सुयोग्य महत्त्व मनावर ठसावे, यासाठी एक लेख पोस्ट करीत आहे.
"अन्नं बहु कुर्वीत । अन्नं ब्रह्मेति व्यजानात् । अन्नं न निन्द्यात् ।" असा गौरवपूर्ण विचार मांडणारी आमची ऋषीप्रणित भारतीय संस्कृती ! अन्नाला नावे ठेवू नयेत. अन्न भरपूर करावे, पात्रापात्र न पाहता सर्व गरजवंतांना अन्न द्यावे. अन्न ब्रह्मरूपच मानावे. एक शीत देखील वाया घालवू नये; असे आवर्जून बिंबवणारी आमची भारतीय संस्कृती काळाच्या उदरात गुडुप झालीये की काय? पौराणिक कथेत का होईना, पण एक तीळ सात जणांमध्ये वाटून खाण्याचा आदर्श वस्तुपाठ आमच्या मनावर उमटवणारी आमची संस्कृती श्रेष्ठ आहे, हे विसरून चालणार नाही !
जीवनरूपी ग्रंथाचे आद्य भाष्यकार, भगवान श्री ज्ञानदेवांची एक सुंदर श्रुती आहे. भगवद्गीतेचा शिष्ट संप्रदाय सांगताना ते अर्जुनाला म्हणतात,
धालिया दिव्यान्न सुवावें ।
मग जे वाया धाडावें ।
तें आर्तीं कां न करावें ।
उदारपण ॥
॥ ज्ञाने.१८.६७.१९४३ ॥
ज्याचे पोट भरलेले आहे त्यालाच पुन्हा प्रसादाचे दिव्य अन्न खाण्याचा आग्रह करावा आणि एक प्रकारे ते दिव्यान्न वाया घालवावे; यापेक्षा ज्याला गरज आहे, ज्याला अन्न मिळतच नाही किंवा जो दोनवेळच्या पोटभर जेवणाला मोताद आहे, त्याला का तुम्ही हे तुमचे उदारपण दाखवत नाही? माउलींच्या या प्रश्नाचे आपल्यापैकी कितीजण योग्य उत्तर देऊ शकतील?
माझी एक कळकळीची विनंती आहे सर्वांना ! अन्नाचे महत्त्व वेळीच ओळखा व आपल्या मुला-बाळांनाही योग्य वयात ते महत्त्व असे बिंबवा की मरेपर्यंत कधीच विसरता कामा नये. कोणतेही अन्न हे भगवंतांच्या कृपेनेच समोर येते, त्याला नावे ठेवू नयेत. आवडीचे नसले तरी न कुरकुरता खावे. एकवेळ खाल्ले तर काही फरक पडत नाही. आई-वडिलांनी ही सवय स्वतःपासून सुरू करावी. मुले पाहून पाहून आत्मसात करतील. शिवाय आपल्या घासातला एक घास तरी गरजवंताला देण्याची उत्तम सवय लावून घ्यायला हवी. यथाशक्य द्यावे पण देत रहावे. देव भरभरून परतफेड करतातच त्याची !
जाता जाता एक फार महत्त्वाचा शास्त्रसिद्धांत सांगतो. संत वाङ्मयाचे थोर अभ्यासक, योगिराज श्री.मामासाहेब देशपांडे महाराज नेहमी सांगत की, "अन्नाचे एक शीत जरी आपल्या माजोरीपणाने किंवा हलगर्जीपणाने वाया घालवले तर त्या प्रत्येक शितासाठी एक आख्खा जन्म अन्नान्नदशेत काढावा लागतो, असे वेदवचनच आहे. म्हणून अन्नाचे महत्त्व ओळखा व चुकूनही कधी त्याची नासाडी होऊ देऊ नका !" हा सद्विचार पक्का ठसणे व त्यानुसारच वागणे, हीच खरी "अन्न सुरक्षा" आहे !
ही शाकंभरी पौर्णिमा, ब्रह्मरूप अन्नाच्या या भान-जाणीवेच्या स्निग्ध दीपाने उजळवून आपण सर्वजण जाणतेपणाने साजरी करूया व पुढील पिढ्यांसाठीही आदर्श घालून देऊया ! " जीवन करि जीवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म । उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ।।" अशी भाव-जागृती, सर्वांच्या अंतरात बोध-पौर्णिमा साजरी करीत बहरून येवो, हीच याप्रसंगी प्रार्थनापूर्वक शुभकामना !! आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
साभार:- लेखक रोहन उपळेकर यांच्या लेखाचा सारांश.